FPI Outflow : जागतिक भू-राजकीय तणावाचा थेट फटका भारतीय शेअर बाजाराला बसताना दिसत आहे. पश्चिम आशियातील बिघडत चाललेली परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी तब्बल २१,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकल्याने बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
४ सत्रांत मोठी विक्री: फेब्रुवारीतील कमाई पुसली!
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, २ मार्च ते ६ मार्च या दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी मार्केटमधून २१,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत. विशेष म्हणजे, ३ मार्च रोजी होळीमुळे बाजार बंद असूनही केवळ चार व्यापारी सत्रांमध्ये इतकी मोठी विक्री नोंदवली गेली.
फेब्रुवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी २२,६१५ कोटी रुपयांची मोठी खरेदी केली होती, जी गेल्या १७ महिन्यांतील सर्वाधिक मासिक खरेदी ठरली होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीलाच झालेल्या या विक्रीमुळे फेब्रुवारीतील सर्व सकारात्मक कल पुसला गेला आहे.
मागील काही महिन्यांचा कल (FPI कडून झालेली विक्री)
जानेवारी २०२६: ३५,९६२ कोटी रुपये (बाहेर पडले)
डिसेंबर २०२५: २२,६११ कोटी रुपये (बाहेर पडले)
नोव्हेंबर २०२५: ३,७६५ कोटी रुपये (बाहेर पडले)
का पळ काढतायत परदेशी गुंतवणूकदार?
- बाजार तज्ज्ञांच्या मते, या विक्रीमागे मुख्यत्वे 'मिडल ईस्ट संकट' कारणीभूत आहे.
- होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव: एंजेल वनचे वरिष्ठ विश्लेषक वकारजावेद खान यांच्या मते, होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत होण्याच्या भीतीने जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला आहे.
- कच्च्या तेलाचा भडका: ब्रेंट क्रूडचे दर ९० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
- सुरक्षित गुंतवणुकीकडे कल: जागतिक अनिश्चितता वाढली की, मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमधून पैसे काढून सोने किंवा डॉलरसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात.
वाचा - लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना
गुंतवणूकदारांसाठी पुढे काय?
परदेशी गुंतवणूकदारांची ही 'वेट अँड वॉच'ची भूमिका भारतीय बाजारासाठी चिंतेची ठरू शकते. जरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी, जागतिक संकटाची झळ बाजाराला बसत आहे. जर मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला नाही, तर येणाऱ्या दिवसांत बाजारात अधिक उतार-चढाव पाहायला मिळू शकतात.
